- अनधिकृत बांधकाम आंदोलन; वडगाव आणि पिंपरी न्यायालयाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भगवान वाल्हेकर, एकनाथ पवार, नामदेव ढाके यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततता झाली. दहा वर्षांपासून सुनावणी सुरु होती. दहा वर्षांनी महिन्याभरापूर्वी वडगाव आणि शुक्रवारी पिंपरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा बारा वर्षांपूर्वी ऐरणीवर आला होता. महापालिका प्रशासनाने बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली होती. या कारवाईमुळे शहरातील नागरिक, उपजिवीका भागविण्यासाठी आलेल्या कष्टक-यांवर बेघर होण्याची वेळ आली होती. या कारवाईविरोधात त्यांनी मोठे जनआंदोलन उभारले. तत्कालीन प्राधिकरण कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढला. कारवाई विरोधातील जनतेचा तीव्रता राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी निगडीतील भक्ती-शक्तीपासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन मुंबईतील मंत्रालयावर, नागपूरला विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. महामार्ग रोखणे, गर्दी जमवणे, गर्दीचे नेतृत्व करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, एकनाथ पवार, नामदेव ढाके यांच्यावर मावळ, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.
महामार्गा रोखणे, जमाव जमवणे, जमावाचे नेतृत्व करणे, जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत वडगाव, पिंपरी न्यायालयात खटला चालू होता. वेळेत आरोपपत्र दाखल न करणे आणि सबळ पुराव्याअभावी महिन्याभरापूर्वी वडगाव आणि शुक्रवारी पिंपरी न्यायालयाने खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आंदोलकांची निर्दोष मुक्ततता केली.













