- राज्यात धनुष्यबाण व कमळाची हवा – आदित्य ठाकरे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ९ एप्रिल) :- गळ्यात भगवी उपरणी, टोप्या घालून शिवसेना-भाजपचे झेंडे घेऊन ढोल ताशांच्या गजरात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आढळराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना-भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते व तरुणवर्गाचा मोठा सहभाग होता.
त्यापूर्वी नरपितगिरी चौकात सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागात जाऊन महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही भरत आहोत. तसेच या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा जिंकतील, असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात धनुष्यबाण आणि कमळाची हवा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बैलगाडी मधून येत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.










