- चालू वर्षी तब्बल साडेपाच हजार रिक्षा परमिटचे वाटप….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने यंदा साडे पाच हजार रिक्षा परमिटचे वाटप करण्यात आले आहे. जानेवारी २०२३ ते ऑगस्ट दरम्यान आरटीओने ही कार्यवाही केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली. त्यामुळे शहरात आणखी रिक्षा धावणार असल्याचे चित्र आहे.
वाढती बेरोजगारी पाहता अनेक जण रिक्षा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मोशी येथील आरटीओ कार्यालयाकडे परमिटसाठी अर्ज करत आहेत. २०१७ पासून रिक्षा परवाना वाटप खुला करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला परमीट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रितसर कागदपत्रे घेतल्यानंतर आरटीओकडून संबंधितांना परमिट दिले जात आहे. या वर्षी आठ महिन्यांत ५ हजार ६६७ रिक्षाचालकांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे.
आठ महिन्यांपैकी मे, जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक तीन हजार रिक्षा परमिटचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये मे महिन्यात १ हजार ०९, जून महिन्यात १ हजार ०४, जुलै महिन्यात ९९० परमिट वाटप करण्यात आले आहे. या बरोबरच जानेवारी महिन्यात ४२२, फेब्रुवारीमध्ये ५९०, मार्चमध्ये ५४७, एप्रिलमध्ये ४३७ आणि ऑगस्ट महिन्यात ६६८ रिक्षाचे परमिट वाटप झाल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. त्यामधून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मनमानी पद्धतीने रिक्षा चालक रिक्षा उभी करत आहेत. त्याचा इतर वाहनांना त्रास होत आहे. तर नियमबाह्यपणे प्रवाशांची ने-आण केली जात आहे. नियमबाह्य वागणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.















