न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- राज्यातील तलाठ्यांची बदली आता प्रांत स्तरावर न राहता जिल्हास्तरावर होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला असून, यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांना असलेले बदलीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सबंध शासन सेवा एकाच प्रांताधिकारी कार्यालयात देणाऱ्या तलाठ्यांना अन्य प्रांताधिकारी तसेच जिल्हाअंतर्गत सेवा बजावता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तलाठ्यांच्या रिक्त पदांचा समतोल साधून त्यांची सेवाज्येष्ठताही जिल्हास्तरावर निश्चित केली जाणार आहे. परिणामी तलाठ्यांकडून अधिक चांगल्या प्रकारे सेवा करून घेता येणार आहे.
तलाठी, सर्कल व लिपिक या गट क संवर्गातील पदांसंदर्भात दोन वेगवेगळ्या आस्थापना लागू होत्या. तलाठी कार्यालय सर्कल व लिपिकांच्या आस्थापना जिल्हाधिकारी कार्यालयात तर तलाठ्यांच्या संदर्भातील आस्थापना प्रांताधिकारी स्तरावर होत्या. त्यामुळे तलाठ्यांच्या बदल्या, सेवाज्येष्ठता हे प्रांत अधिकारी ठरवत होते. राज्यातील अनेक प्रांताधिकारी कार्यालय दोन तालुक्यांचे आहे, तर अनेक कार्यालये केवळ एका तालुक्यापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे एक तलाठी या तालुक्यात रुजू झाल्यानंतर त्याची सेवा संपेपर्यंत तो त्याच प्रांताधिकारी कार्यालयात सेवा बजावत होता. संबंधित प्रांताधिकारी कार्यालयातील आस्थापनेच्या संख्येनुसार त्यांची रिक्त पदावर बदली होत होती. मात्र संबंधित तलाठ्याला अन्य तालुक्यात बदली करायची झाल्यास प्रांताधिकारी अनेकदा रिक्त पदांचा किंवा आस्थापनेचा संदर्भ देत ती बदली नाकारत होते. बदली जरी झाली तरी संबंधित तलाठ्याला आपली सेवाज्येष्ठता गमवावी लागत होती. त्यामुळे तलाठी एकदा एका तालुक्यात रुजू झाल्यानंतर त्याच तालुक्यात सबंध सेवा बजावत होते. त्यातून तलाठ्यांच्या कामांमध्ये देखील एकसुरीपणा दिसून येत होता.
राज्यात ही व्यवस्था २०१३ पासून अस्तित्वात होती. राज्य सरकारने आता यात बदल करून प्रांताधिकारी कार्यालयावरील असलेली आस्थापना आता जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांच्या बदल्या, सेवाज्येष्ठता याचे दप्तर जिल्हास्तरावर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एका तालुक्यातील तलाठ्याला त्याच्या सोयीनुसार अन्य तालुक्यात किंवा प्रशासनाच्या सोयीनुसार त्याची बदली करता येणार आहे. त्यात त्याला सेवाज्येष्ठता गमावण्याचा धोका नसेल
या निर्णयामुळे वेगवेगळ्या तालुक्यांतील वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार उपक्रमशीलतेनुसार काम करण्यास तलाठी प्रवृत्त होतील. रिक्त जागांनुसर त्यांच्या बदल्या करून जिल्ह्यातील समतोल साधला जाईल.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे


















