- घरांची हस्तांतर प्रक्रियाही अडकली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वितरित केलेले काही भूखंड दोन व्यक्तींमध्ये वितरित झालेले आहेत. सध्या या भूखंडांवर दोन-दोन घरे झाली आहेत. ज्यांनी एकत्रितपणे हे भूखंड घेतले आहेत त्यांना एकमेकांचे संमतीपत्र घेतल्याशिवाय भूखंड किंवा घरांची हस्तांतर प्रक्रिया करता येत नाही. काही ठिकाणी वारसांमध्ये त्यावरुन वाद होत आहेत. दरम्यान, आता याबाबतचे निर्णय महापालिकेच्या अखत्यारित गेले असल्याने नागरिकांना त्यासाठी महापालिका कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.
तत्कालीन प्राधिकरणाकडून नागरिकांना वितरित केलेल्या निवासी भूखंडांबाबत सध्या विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. दोन किंवा अधिक व्यक्तींना केलेल्या भूखंड वाटप प्रकरणांमध्ये नागरिकांनी एका भूखंडावर दोन घरे बांधली आहेत. ही घरे बांधताना त्यांनी सामायिक भिंत ठेवली आहे. अशा प्रकारांमध्ये भूखंड हस्तांतरणाच्या वेळी सहधारकाचे संमतीपत्र किंवा एनओसी लागते. बऱ्याचदा ही एनओसी मिळण्यात विविध अडचणी येतात. पर्यायाने, हा वाद वर्षानुवर्ष राहतो.
निगडी-यमुनानगर परिसरातील सुमारे १०० ते १५० भूखंड धारकांच्या बाबतीत अशी अडचण सध्या जाणवत आहे. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून रहिवाशी वापरासाठी यापूर्वी भूखंड वितरित झाले होते. हे भूखंड देताना एक भूखंड दोन-दोन व्यक्तींमध्येदेखील वितरित झाला होता. दरम्यान, आता नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाले आहे. दरम्यान, प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करताना निवासी भूखंडांबाबत विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अधिकार गेले आहेत. त्यामुळे याबाबतची कार्यवाही आता महापालिका स्तरावर होत आहे.
एका भूखंड दोन व्यक्तींनी घेतला असेल आणि त्यांनी त्यावर स्वतंत्र घरे बांधली असतील तर घरांची हस्तांतर प्रक्रिया करताना अडचणी येत आहेत. याबाबत धोरण ठरविण्यात यावे. तसेच, एक खिडकी योजनेद्वारे हस्तांतर प्रक्रिया सुलभ करावी. त्याचप्रमाणे, यासाठी लावलेल्या विविध जाचक अटी शिथिल कराव्यात.
– प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसेवक…एक भूखंड दोन व्यक्तींमध्ये घेतला असेल आणि दोघांनी तेथे घरे बांधली असतील अशा परिस्थितीत त्यांना भूखंड हस्तांतर करताना एकमेकांची एनओसी घ्यावी लागणार आहे. तत्कालीन प्राधिकरणाकडे असलेल्या भूखंडांच्या हस्तांतराचे अधिकार आता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग झाले आहेत. नागरिकांनी आपापसातील वाद मिटवून महापालिकेकडून आवश्यक हस्तांतर प्रक्रिया करून घ्यावी.
बन्सी गवळी, सहआयुक्त, पीएमआरडीए…












