न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- लायन्स क्लब ऑफ भोजपुर गोल्ड, इंद्रायणी वोकेशनल ज्युनिअर कॉलेज, सुपर कम्प्युटर इन्स्टिट्यूट व शारदा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंती निमित्त सोमवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये परिसरातील 30 शाळांनी सहभाग घेतला. 5 वी ते 7 वी या गटामध्ये 29 विद्यार्थी 8 वी ते 10 वी या गटांमध्ये 18 विद्यार्थी व 11 वी 12 वी या गटांमध्ये तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड, इंद्रायणी वोकेशनल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शंकर देवरे, शारदा क्लासेसचे संचालक दिगंबर ढोकले, सु. ना. बारसे विद्यालयाचे लाड, वाघेश्वर विद्यालयाच्या रूपाली पाटील व काळे मॅडम यांनी परीक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक विलास वाळके हे होते.
दरम्यान विद्यार्थ्यांना दिलेल्या विविध विषयावर उत्स्फूर्तपणे भाषणे झाली. छोट्या गटांमध्ये जिल्हा परिषद शाळा कुरळी या शाळेतील इयत्ता 5 वीच्या वर्गातील कु. समीक्षा राधेश्याम झाडोकार हिचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक प्रज्ञा बाळासाहेब साबळे, केतन राजू सांगळे याचा तृतीय क्रमांक आला. 8 वी ते 10 वी या गटामध्ये समृद्धी देशमुख प्रथम क्रमांक, प्रार्थना समुद्र द्वितीय क्रमांक, कार्तिक मुसळे तृतीय क्रमांक तर 11 वी 12 वी या गटांमध्ये कुणाल कोरडे प्रथम क्रमांक, सिद्धी साळवे द्वितीय क्रमांक, आकाश अनंतवार तृतीय क्रमांक याप्रमाणे रोख बक्षीसे व ग्रंथ, वाचनीय पुस्तके देऊन मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमलता साबळे यांनी तर, आभार शंकर देवरे यांनी मानले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी महात्मा गांधींचे अहिंसा तत्वज्ञान, भारताची चांद्रयान मोहीम, G 20 आयोजन आणि भारत, आरक्षण – जातीवर की आर्थिक निकषावर?, मोबाईल मुक्ती, वाचूया आनंदे, संत साहित्य – शाश्वत मूल्य, खेळाचे महत्व यावरील सर्वच विषयात मुलांची उत्स्फूर्तपणे भाषणे ऐकून शिक्षक पालक व मान्यवरांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
भोसरीतील सुपर कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या या कार्यक्रमांमध्ये लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले, भावी पिढी अत्यंत प्रगल्भतेने विचार करत आहे. त्यांना एक व्यासपीठ करून देणे गरजेचे आहे. ते व्यासपीठ लायन्स क्लबच्या व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल व यातूनच भावी भारताचे स्वप्न साकार होईल.












