न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी निवेदिता घार्गे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी बुधवारी (दि. ४) रोजी देहु नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. देहुचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव हे रजेवर गेल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रभारी म्हणून पदभार पाहत होते.
जाधव यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. घार्गे यांनी पदभार स्वीकारल्याने कायम मुख्याधिकारी पदाच्या मागणीचा प्रश्न निकाली लागला आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी यांनी जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपरिषद त्यानंतर राजगुरुनगर (खेड) नगरपरिषद येथे मुख्याधिकारीपदाचे कामकाज पाहिले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर निवेदिता घार्गे यांचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, नगरपरिषदेचे आजी माजी पदाधिकारी, विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आदींनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, संत तुकोबारायांची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.













