- गावातील विकासकामांवर येणार अंकुश; आचारसंहिता लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- मावळ तालुक्यातील निवडणुकीचे बिगुल वाजले असून, तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या कान्हे, नवलाख उंब्रे, साळुंब्रे, बेबेडोहळ, सुदुंबरे यासह ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान होणार असून, दिवाळीपूर्वीच फटाके फोडले जाणार आहेत.
कान्हे, नवलाख उंब्रे, शिवणे, साळुंब्रे, बेबेडोहळ, शिरगाव, उदेवाडी, कल्हाट, सुदुंबरे, भाजे, शिळिंब, दिवड, मळवंडी ढोरे, तुंग, सावळा, कुसगाव बुद्रुक, मुंढावरे, कोंडीवडे अमा, सुदवडी, सांगिसे, आढले बुद्रुक, ओवळे, दारुंब्रे, चिखलसे, आंबळे, जांबवडे, लोहगड, डोणे, खांडशी, पुसाणे या तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्याने गावचा कारभार प्रशासनाकडे होता. सर्व पक्षातील गावोगावच्या इच्छुकांनी गेल्या सहा महिन्यांपासून मोर्चेबांधणी करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शन सहली, महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा व इतर कार्यक्रम घेऊन खर्च करण्यास सुरवात केली होती.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार हे नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२३ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा २५ ऑक्टोबर २०१३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असून, सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. तर मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिसूचना प्रसिद्ध करतील.













