न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरात खासगी जागेत उभारण्यात आलेले जाहिरात होर्डिंग स्ट्रक्चरसह विकले जातात. शहरात खासगी जागेत एकूण १ हजार १३६ अधिकृत जाहिरात होर्डिंग आहेत. या होर्डिंगचालकांना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने परवाना दिला आहे. या जाहिरात होर्डिंगचे दरवर्षी नियमानुसार नूतनीकरण करण्यात येते. शहरातील खासगी जागेतील काही होर्डिंग विकण्यात आले आहेत. होर्डिंग विकत घेतलेल्या जाहिरात एजन्सीने आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार असे हस्तांतरण करता येत नाही.
मात्र, राज्य शासनाच्या जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ च्या अधिसूचनेतील कलम २४ नुसार नव्याने जाहिरात होर्डिंग हस्तांतरणाची तरतूद करून दिली आहे. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरात होर्डिंग हस्तांतरणास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जाहिरात होर्डिंग हस्तांतरणासाठी परवाना शुल्काच्या १० टक्के शुल्काची आकारणी करून हस्तांतरण करण्यात येणार आहे. हे शुल्क जाहिरात फलक हस्तांतरण शुल्क’ यानव्या लेखाशीर्षात जमा केले जाणार आहे.
२५ जाहिरात होर्डिंगचे हस्तांतरण करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. परवाना शुल्काच्या दहा टक्के रक्कम भरून घेऊन हे हस्तांतरण केले जाणार आहे, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.












