- ‘स्मार्ट सिटी’ने सुयोग टेलिमॅटिक्स, फायबर स्टोर कम्युनिकेशनची निविदा गुंडाळली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२३) :- विविध गुन्हे दाखल असलेल्या कंपनीकडे शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क टाकण्याचे काम देण्यात आले होते. याबाबत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे विविध पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर ‘स्मार्ट सिटी’ने सुयोग टेलिमॅटिक्स, फायबर स्टोरी कम्युनिकेशनची निविदा रद्द केली आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडून केबल नेटवर्क सोपविण्याची निविदा काढण्यात आली. दहा वर्षांसाठी उत्पन्न शेअरिंग मॉडेलवर काम देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांसाठी भाड्यातून महापालिकेस दरवर्षी ३२.४ कोटी मिळणार होते.
अतिरिक्त महसुलावर स्मार्ट सिटीला अतिरिक्त महसूल म्हणून किमान २१ टक्के मिळणार होते. मात्र, बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविल्याबद्दल गुन्हा दाखल केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधितांकडेच अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविल्याचे दिसून आले. याबाबत महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आवाज उठविला. कागदपत्रे बनावट असल्याचा आक्षेप नोंदविला होता. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस, मनसेच्या वतीनेही आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर स्मार्ट सिटीने संबंधित कंपनीस नोटीस दिली होती. चौकशी करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती.
दोन महिन्यांपूर्वी राज्यातील सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी झाला आणि त्यांनी पालिकेत लक्ष घातले. त्यावेळी पवार यांनी प्रकरणाची चौकशी करा, अशा सूचना केल्या होत्या. त्यावर प्रशासनाने निविदा रद्द केली आहे.












