- अभिनेते नाना, मकरंद यांच्या नाम फाउंडेशनचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; डॉ. कोल्हे यांचे भरीव कार्य कोणते?
- खा. आढळराव यांना पुन्हा विक्रमी मतांनी निवडून आणणारच
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल) :- युती सरकारच्या कामगारांसाठीच्या अनेक योजना माथाडी, असंघटित, बांधकाम कामगारांपर्यत व तळागाळापर्यंत पोहचत आहेत. सरकार कामगार हितासाठी धोरण बनवीत आहे. सरकारी योजना खालच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यास हे सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेमार्फत सरकारच्या सर्व योजनांचा शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष दहा हजार बांधकाम कामगारांना लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे १०० टक्के बांधकाम कामगार, माथाडी कामगार शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र मजदूर संघटनेची विविध क्षेत्रातली चाळीस हजार कामगारांची ताकद शिवसेनेच्या मागे उभी करणार आहे, अशी माहिती भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी दिली.
इरफान सय्यद हे एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिरूर मतदार संघ हा जवळपास १५ वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीकडून शिरूर मतदार संघात नेहमीप्रमाणे उमेदवार दिला जातो व नेहमीप्रमाणेच तो पडतोही. मागील वर्षी राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार कमकुवत होता, असे विधानही राष्ट्रवादीकडूनच केले जाते. यावर्षी तर चक्क राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावा लागला आहे, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी राष्ट्रवादीवर केली.
शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे चित्रपटसृष्टीत योग्य होते. त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांचे शिरूर मतदार संघासाठी काय योगदान आहे. ज्याप्रमाणे अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. तसे कोणते भरीव कार्य कोल्हे यांनी केले आहे.
राज्याचे सोडाच परंतु, ते ज्या मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत. त्या मतदार संघात तरी कोल्हे यांचे काय काम आहे. कोल्हे म्हणतात की, ”माझ्याकडे केवळ अभिनेता नाही, तर सुशिक्षित उमेदवार म्हणून पहा”. डॉ अमोल कोल्हे हे स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेतात. शिवसेनेत असताना लोकप्रतिनिधींच्या तोडीस तोड ”संपर्कप्रमुख” हे पद त्यांच्याकडे होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी कोणते समाजकार्य व काय दिवे लावले. ते केवळ स्वार्थासाठी राष्ट्रवादीत गेले आहेत. खासदारकीच हवी होती, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागीतली असती. उद्धव ठाकरे यांनी ती त्यांना सहज मिळवून दिली असती. त्यांनी शिवसेना सोडून जायला नको होते, असेही ते म्हणाले.
महायुती ही मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी केली आहे. आज देशाला त्यांची गरज आहे. दिल्लीचे तक्त राखायचे असेल, तर मित्रपक्षांशी युती करण्याशिवाय पर्याय नव्हता. खासदार आढळराव गेली १५ वर्षे समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांचे चारित्र्य स्वच्छ आहे. मतदारसंघात कोणतीही कामे रखडलेली नाहीत. त्यांच्याकडे विकासाची इच्छाशक्ती आहे. त्यामुळे आढळराव पुन्हा एकदा विक्रमी मतांनी निवडून येणार व आम्ही आणणारच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.










