- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना सांगवी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदारास पोलिस चौकीमध्येच रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ही कारवाई केली.
सहायक फौजदार सुनील शहाजी जाधव (४९, नेमणूक सांगवी पोलिस ठाणे) असे रंगेहात पकडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने एसीबीकडे तक्रार दिली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराचे बांधकाम पिंपळे सौदागर येथे सुरू आहे. या बांधकामाचा ठेका बांधकाम व्यावसायिक कराळे यांना दिला होता. घराच्या बांधकामाबाबत व्यावसायिक कराळे व तक्रारदार महिला यांच्यात करार झाला होता. करारानुसार बांधकाम व्यावसायिक कराळे यांनी काम वेळेत पूर्ण केले नाही. कराळे यांचे बांधकामाचे साहित्य तक्रारदार महिलेच्या ताब्यात होते. ते साहित्य कराळे तक्रारदार महिलेकडे मागत होते. परंतु बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांचे बांधकाम साहित्य देण्यात येईल, असे तक्रारदार महिलेने कराळे यांना सांगितले.
दरम्यान, कराळे यांनी तक्रारदार महिलेच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून महिलेविरुद्ध कारवाई न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव याने प्रथम ६० हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ५० हजारांच्या लाचेची मागणी केली.















