न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :-भारतीय शिक्षण व्यवस्थेत महर्षी दयानंद यांचे संस्कार विधी ग्रंथातील विधींचा आणि भारतीय कुटुंब संहितेचा समावेश केला पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केले.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र व विजयादशमीचे औचित्य साधून हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन शनिवारी चिंचवड येथे करण्यात आले आहे. यावेळी ॲड. उपाध्याय यांचे रामराज्य आणि भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी प्रा. डॉ. धनंजय सोमनाथ भिसे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाज भूषण पुरस्कार २०२३ आणि अरुण श्रीपती पवार यांना स्व. संजय आर्य स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२३ संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पं. धर्मवीर आर्य, पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, संयोजक सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर मॅकलेची शिक्षण व्यवस्था स्वीकारण्यात आली. यातील दोष समजण्यास ७५ वर्षाचा काळ लागला. गुरुकुल शिक्षण व्यवस्था योग्य आहे. देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर वाढती लोकसंख्या आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी ४ कोटी असणारी लोकसंख्या ७५ वर्षात १४० कोटी झाली. आजही देशात ८० कोटी गरीब आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व यंत्रणेवर ताण निर्माण होतो. त्यासाठी एक भारतीय कुटुंब संहिता बनवणे आवश्यक आहे. जल, जमीन, जंगल, भूक, भेसळ, गुन्हेगारी, आरोग्य, शिक्षण या सर्व समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण करण्याची गरज आहे.
स्वागत, प्रास्ताविक करताना उत्तम दंडीमे यांनी सांगितले की, भारताला बलसंपन्न आणि शक्तिशाली बनवण्यासाठी, महिलांना सक्षम करणे, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत वेद विद्यालय सुरू करणे यासाठी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान काम करीत आहे.
सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले तर आभार सुहास पोकळे यांनी मानले.


















