न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन, ज्युनिअर कॉलेज व लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला, सांगवी परिसरातील विविध मंडळामध्ये ‘थुंकीमुक्त रस्ता अभियाना’ची जनजागृती, देवीची आरती, पर्यावरण संवर्धनावर आधारित पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
परंपरेनुसार हत्तीच्या मूर्तीचे व रेखाटन केलेल्या हत्तीच्या चित्राचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव प्रणव राव, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील नवरात्रौत्सव मंडळाच्या समोर विद्यार्थ्यांनी ‘थुंकीमुक्त रस्ता अभियाना’ची जनजागृती केली. तसेच पर्यावरण संवर्धनावर आधारित पथनाट्य सादर केले. विद्यार्थिनींबरोबर शिक्षिकांनीही गाण्याच्या तालावर गरबा नृत्य केले. तसेच वेगवेगळे दांडिया प्रकार सादर केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी आकर्षक रंगीबेरंगी पोशाखामध्ये दांडियाचा आनंद लुटला. तसेच विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच आलेल्या सुवासिनींना सौभाग्याचं लेणं म्हणून अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे बांगड्या भरण्यात आल्या व विद्यार्थिनींनी मेहंदी देखील काढली.
जुनी सांगवीतील शितोळेनगर नवरात्रौत्सव मंडळ, पिंपळे गुरवमधील विद्यानगर महिला मंडळ, तुळजाई महिला मंडळ आणि सांगवी प्रतिष्ठानच्या देवीची महाआरती अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शितोळेनगर क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय शितोळे, कार्याध्यक्ष अतुल शितोळे, विद्यानगर महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा अहिरे, तुळजाई महिला मंडळाच्या अध्यक्षा पूनम भदाणे, सांगवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश काची आदी उपस्थित होते.