- पालिकेकडून प्रभाग निहाय फेरीवाला क्षेत्राची लवकरच अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) :- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कै. मधुकर पवळे सभागृह येथे पिंपरी चिंचवड मनपा शहर फेरीवाला समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. तसेच शहर फेरीवाला समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीमध्ये शहरांमधील विविध भागांमध्ये जे फेरीवाले व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी त्याच भागांमध्ये हॉकर्स झोन किंवा फेरीवाले क्षेत्र निर्माण करण्याचे ठरविले आहे. यामध्ये खालीलप्रमाणे प्रभाग निहाय फेरीवाला क्षेत्र ठरविले आहेत.
अ.क्र. | प्रभागाचे नाव | हॉकर्स झोन संख्या | हॉकर्स क्षमता |
१ | अ क्षेत्रिय कार्यालय | ०४ | ९२ |
२ | ब क्षेत्रिय कार्यालय | ०६ | ३७० |
३ | क क्षेत्रिय कार्यालय | ०८ | १०५२ |
४ | ड क्षेत्रिय कार्यालय | १२ | ३४६ |
५ | इ क्षेत्रिय कार्यालय | ०८ | २५७ |
६ | फ क्षेत्रिय कार्यालय | ०७ | १०६० |
७ | ग क्षेत्रिय कार्यालय | १२ | ५७० |
८ | ह क्षेत्रिय कार्यालय | ०६ | ४५७ |
ज्या भागात जास्त प्रमाणात रहदारीस अडथळा निर्माण होतो, अशा ठिकाणी प्राधान्याने हॉकर्स झोन निर्माण करून सदरचे रस्ते व चौक मोकळे करणे हा प्रमुख उद्देश आहे. शहरातील ज्या फेरीवाल्यांमुळे रहदारीस अडचणी निर्माण होतात, तसेच फुटपाथवरील फेरीवाल्यांवर वारंवार अतिक्रमण विभागामार्फत कारवाई होते, अशा फेरीवाल्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
हॉकर्स झोनमध्ये शहरातील अधिकृत फेरीवाले यांना क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण विभाग व विविध फेरीवाला संघटना यांच्या समन्वयातून जागा वाटप करण्यात येईल. तसेच शहरातील फेरीवाल्यांसाठी जागेचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून महानगरपालिकेला विशिष्ट जागा भाडे/भुई भाडे दिल्यानंतर सदर फेरीवाल्याला त्या जागा वापरण्याचा अधिकार राहील, अशी माहिती भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिली.