- मनसे महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष सचिव रूपेश पटेकर यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- महापालिकेच्या विविध विभागात आणि क्षेत्रीय कार्यालयात ठेकेदारांमार्फत कंत्राटी पध्दतीने अनेक कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याप्रमाणे दिवाळी बोनस निश्चित केला गेला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ठेकेदार करत नसल्याचे दिसून येत आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दिवाळीला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारांनी दिवाळी बोनस द्यावा, यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडण्याचा इशारा मनसे महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष, सचिव रूपेश पटेकर यांनी दिला आहे. याबाबत पटेकर यांनी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे बाळू शिवशरण, सागर शिंदे, आशिष शेलार, सतिश बारसे उपस्थित होते.
पटेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही कंत्राटी कर्मचारी अशिक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना ५ ते ६ हजार रुपये अशा पद्धतीने बोनस दिला जातो. गोरगरीब कर्मचारी आपल्याला कामावरून काढू नये, या भीतीने काम करतात. त्यांना दिवाळी बोनसची अपेक्षा असते. मात्र, ठेकेदार आपली मनमानी करून कर्मचाऱ्यांना दमदाटी करून किमान वेतनाप्रमाणे बोनस देत नाहीत. ही बाब गंभीर असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोनस नियमाप्रमाणे होतो का नाही याची माहिती घ्यावी. अन्यथा मनसेच्या वतीने पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके फोडण्यात येतील, असा इशारा रूपेश पटेकर यांनी दिला आहे.
आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देतो. कोणालाही डावलत नाहीत. तरीही याबाबत माहिती घेऊ. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिं. चिं. मनपा…












