न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयातील प्रतिभा फिनिशिंग स्कूल व प्लेसमेंट सेल या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याच्यात कुशलता निर्माण करणे, अनुभव मिळावे. पदवी घेताच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नऊ प्रशिक्षण देणार्या संस्था व कंपन्यांसमवेत सामंजस्य करार लिखित स्वरूपात करण्यात आला.
त्यात टेक्व्यू इन्फोटेक प्रा.लि.-अर्जुन वडगावे, मेगा कॉर्पसोल-किरण उंबरदंड, प्रथम फाऊंडेशन-केतन साठे, पोर्टल विंझ सोल्युशन-श्रेयश कुलकर्णी, आयुष सर्व्हिसेस-अरूण वासंगकर, पी.एस.पी.आय.पी. असोसिएट्स प्रा.लि.-अॅड. सुर्यकांत पाटील, आर.एस.एल.प्रा.लि.-रूपेश मुनोत, इन्पीव्हरीटाज-अरूण मोरे, स्कील अॅकॅडमी-महेश कोल्हे विविध प्रशिक्षण देणार्या संस्थांचे प्रमुख व कंपन्यांच्या अधिकार्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक डॉ. दिपक शहा यांनी लिखीत स्वरूपात सामंजस्य करार करून त्याचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत संस्थेच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, विभाग प्रमुख प्रा. गुरूराज डांगरे, डॉ. जयश्री मुळे, प्रा. मनीष पाटणकर, प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख डॉ. हर्षिता वाच्छानी, सहाय्यक शंकर जाधव यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचे अदान-प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा मनोगतात म्हणाले, विविध शाखेत विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांना त्याच्या आवडत्या क्षेत्रातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देवून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणवत्तेला वाव मिळावा, त्याचबरोबर पदवीग्रहण करतानाच विद्यार्थी एक परिपूर्ण संस्थेतून बाहेर पडावा, यासाठी विविध शाखेत शिक्षण घेत असलेला प्रत्येक विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, औद्योगिक आदी क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव तज्ञाकरवी प्रशिक्षण स्वरूपात देण्याचा मुख्य उद्देश आहे, यासाठी आज नऊ विविध प्रशिक्षण देणारे संस्था, कंपन्यांनी पुढाकार घेतला याचा मनस्वी आनंद होत आहे. ‘एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून आपण प्रयत्न केला तर नक्कीच संस्थेचे भविष्यातील आमचे स्वप्न साकार होईल. गेली काही वर्षे संस्थेतील होतकरू विद्यार्थ्यांना 20 ते 50 हजार रूपये भांडवली स्वरूपात आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांच्या सुप्त इच्छाशक्तींना प्रत्यक्ष कृतीरूपी त्यांचे व्यवसायिक होण्याचे स्वप्नही साकार केले आहे. याची महाराष्ट्र शासनाने देखील दखल घेतली ही आमच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आज सामंजस्य करारात सहभागी विविध प्रशिक्षण देणार्या संस्था व कंपन्यांकडून आमच्या प्रयत्नांना शुभेच्छा समवेत आशिर्वादाची अपेक्षा बाळगून आहोत. कारण या संस्थेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना चांगले प्रकारचे भावी आयुष्य जगण्याकरिता उत्तम प्रकारचे प्रशिक्षण, कुशलता, कामाचा अनुभवामुळे नोकरी उपलब्ध होतील. त्यांच्या आई-वडीलांचे स्वप्न देखील पूर्ण होतील, या अपेक्षा यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केल्या.
या कार्यक्रमांची प्रस्तावना डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी केली. डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रा. गुरूराज डांगरे यांनी मनोगत व्यक्त केले., प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी माहिती सांगून आभार मानले.