- आ. सुनील शेळके यांची म्हाडाच्या विभागप्रमुखांसोबत सकारात्मक बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२३) :- मावळचे आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी म्हाडा आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात संबंधित विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या. यावेळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेअंती तळेगाव दाभाडे येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांना सदनिका ताब्यात देण्यात येणार असल्याचे आमदार शेळके यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ताबा न मिळू शकलेल्या सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
म्हाडाच्या तळेगाव मधील प्रकल्पाचे बांधकाम २०१८ साली सुरू झाले होते. परंतु, अनेकवेळा मुदतवाढ देऊनही प्रकल्प पूर्ण झाला नाही. यामुळे सदनिका मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रकल्पाला म्हाडाकडूनच विलंब होऊनदेखील यातील वाढीव रक्कम सदनिकाधारकांनी भरावी, असा आग्रह म्हाडाकडून करण्यात येत होता. तसेच प्रत्यक्ष ताबा कधी देणार याबाबत अनिश्चितता होती. यावर आमदार शेळके म्हाडाचे अधिकारी आणि सदनिकाधारक यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली.
यावेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर ए आणि डी विंगमधील सदनिका १५ नोव्हेंबरपर्यंत ताब्यात देण्यात येतील. तसेच १५ डिसेंबरनंतर बी आणि सी विंगमधील नागरिकांना सदनिका ताब्यात देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी आमदार शेळके यांना आश्वासित केले. म्हाडाकडून संबंधित सदनिकाधारकांनी वाढीव रक्कम भरावी, असे सांगितले होते. ती रक्कम नागरिकांनी भरू नये, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
या बैठकीला पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता महेश दातार, उपअभियंता प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे, उपअभियंता संजय नाईक, म्हाडाचे सदनिकाधारक आदी उपस्थित होते.