- १९८३, २०११ ची पुनरावृत्ती होणार? रविवारी होणार फैसला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- भारतीय संघाने मुंबईतल्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडचं आव्हान मोडून काढत ७० धावांनी विजय मिळवला आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. धावांचा महापूर ठरलेल्या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पाच विकेट्स पटकावत भारताला विजय मिळवून दिला.
रनमशीन विराट कोहलीचं विक्रमी ५० वं शतक, श्रेयस अय्यरचं सलग दुसरं शतक यांच्या बळावर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दमदार प्रत्युत्तर दिलं पण दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत गेल्याने न्यूझीलंडचा प्रतिकार अपुराच ठरला.
सेमी फायनलची दुसरी लढत उद्या कोलकाता इथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. त्यांच्यातील विजेत्याशी भारताचा रविवारी मुकाबला होणार आहे.
वानखेडेवर लोकल बॉय अर्थात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत इरादे स्पष्ट केले. रोहित आणि शुबमन गिल जोडीने ७१ धावांची सलामी दिली. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनने उत्तम झेल घेत रोहितला माघारी धाडलं. रोहितने २९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर शुबमन गिलने सूत्रं स्वीकारली. त्याने चौकारांची लयलूट सुरू केली. विराट कोहलीने नेहमीच्या शिरस्त्याने डावाला सुरुवात केली. गिल-कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली. पण दुखापतीमुळे गिलला मैदान सोडावे लागले. गिलच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने मागच्या सामन्यातील लय कायम राखत सुरेख खेळी साकारली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२८ चेंडूत १६३ धावांची मोठी भागादारी साकारली. या भागीदारी दरम्यान टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने वनडे कारकीर्दीतील ५० वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८० व्या शतकाला गवसणी घातली.
विराटचा कित्ता गिरवत श्रेयस अय्यरनेही शतक पूर्ण केलं. चौकार-षटकारांची आतषबाजी करत श्रेयसने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोपलं. श्रेयसने ७० चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह १०५ धावांची खेळी साकारली. के.एल.राहुलने २० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३९ धावांची खेळी केली. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३९/२ अशी झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचीन रवींद्र झटपट माघारी परतले. पण यानंतर केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ चेंडूत १८१ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. मोहम्मद शमीने केनला बाद करत ही जोडी फोडली. केनने ६९ धावांची चांगली खेळी केली. शमीने त्याच षटकात टॉम लॅथमला बाद करत न्यूझीलंडला आणखी धक्का दिला. यानंतर मिचेलला ग्लेन फिलीप्सची साथ लाभली. मिचेलने यादरम्यान शतकही साजरं केलं. शमीने फिलीप्सला बाद करताच न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा मावळल्या. मिचेलने ९ चौकार आणि ७ षटकारांसह १३४ धावांची एकाकी झुंज दिली. भारताकडून मोहम्मद शमीने ७ विकेट्स पटकावल्या.