न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२३) :- बिजलीनगरमध्ये आज शनिवारी (दि. १८) रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. येथील हनुमान स्वीटसमोर इलेक्ट्रिक गाडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच दुचाकीस्वाराने गाडी जाग्यावर सोडून सुरक्षित ठिकाणी पळ काढला. त्यांच्या प्रसंगावधानाने मोठी हानी टळली. गाडी अक्षरश: जळून खाक झाली. त्यामुळे चालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. भर चौकात बघ्यांची आणि वाहनांची मोठी गर्दी जमली होती.
गाडी मालक माधवी जाधव यांनी प्राधिकरण अग्निशमन येथे फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. तसेच एसओ गौतम इंगवले, वाहनचालक अमोल रांजणे, संपत गौंड, संजय महाडिक व सोमनाथ तुकदेव देवगडकर, दानवले या अग्नीशमनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अग्निशमनच्या कर्मचा-यांनी होजरीलच्या साह्याने पेटलेल्या दुचाकीवर पाणी मारले आणि आग विझविली.













