पालिकेच्या जनसंवाद सभेकडे नागरिकांची पाठ?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. यावेळी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या सोमवारच्या ऐवजी तिसऱ्या सोमवारी म्हणजे आज जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ५८ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, ७, ४, ५, ४, ५, ८, आणि १२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर,विजयकुमार सरनाईक यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, उमेश ढाकणे उपस्थित होते.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये मुख्यत्वे शहरातील वायू प्रदूषणावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि शहरातील वाढत्या रहदारीचे योग्य नियोजन करावे अशा सूचनांचा समावेश होता. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, शहर परिसरात वेळोवेळी किटकफवारणी करण्यात यावी या सूचनाही नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
महापालिकेत नगरसेवकांची टर्म पूर्ण झाल्यांनतर निवडणूक होणे अपेक्षित असताना कोर्टात अनेक विषयांवर सुनावण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत. दरम्यान महापालिकेवर दीड वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवट लागू आहे. नागरिक आणि पालिका प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. प्रारंभी नागरिकांनी सभेत विविध समस्या पेश केल्या. मात्र, प्रशासनाचा समस्या सोडविण्याचा वेग मंद असल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे जनसंवाद सभेकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे कि काय असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.