- आयुक्त गैरहजर असल्याने महापालिकेतील कामकाज थंडावले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे जर्मनी दौऱ्यानंतर पुन्हा सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. ते प्रशिक्षण घेण्यासाठी सोमवार (दि.२०) पासून पाच दिवसांसाठी सिंगापूरला रवाना झाले आहेत. सिंह हे आता मंगळवारी (दि. २८) महापालिकेत येतील. आयुक्त गैरहजर असल्याने महापालिकेतील कामकाज थंडावले आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार आयुक्त सिंह प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेले आहेत. या कालावधीत आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राजकीय शिष्टाचार आणि आपत्ती व्यवस्थापनविषयक कामकाज करावे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर या कालावधीत घेतलेल्या कामकाजाचा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विविध कामानिमित्त शहरातील नागरिक आयुक्तांकडे येतात. मात्र, दौऱ्यामुळे आयुक्त सिंह महापालिकेत उपलब्ध नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होते. यापूर्वी आयुक्त तीन-चार दिवसांपेक्षा अधिक काळ शहराबाहेर असल्यास त्यांचा पदभार इतर समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपविला जात होता; परंतु आयुक्त सिंह यांच्या अनुपस्थितीत सलग दोन वेळा शासनाने पुणे जिल्ह्यात समकक्ष अधिकारी असताना कोणाकडे पदभार दिलेला नाही.











