न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत नियमित शुल्कानुसार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (दि. २०) संपली. त्यामुळे मंडळाकडून इयत्ता दहावीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून, इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
बारावीसाठी फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येतील. त्यानुसार नियमित शुल्कासह २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती.
आता विलंब शुल्कासह २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. तर इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. तर २३ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान माध्यमिक शाळांनी चलन काढून बँकेत शुल्क भरायचे आहे.












