- ट्रॅक्टर आणि झाडूच्या सहाय्याने होणाऱ्या रस्ते सफाईमुळेही होतेय हवा प्रदूषित..
- आयुक्तांचे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात हवा प्रदूषित आणि हवेतील गुणवत्तेची पातळी गंभीर झाल्याने महापालिका क्षेत्रातील बांधकाम आणि प्रक्रियेवर १९ नोव्हेंबरपर्यत महापालिका आयुक्तांनी निर्बंध लादले होते. सर्व निर्माण कार्ये थांबविण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश निर्गमित केले होते. दरम्यान एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्यासाठी उपाययोजना केल्यामुळे हवेची प्रदूषण पातळी नियंत्रित झाली, असा दावा करीत ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचे पालन करून, बांधकाम व प्रक्रियेवरील बंदी नंतर आयुक्तांनी मागे घेतली.

दरम्यान बांधकाम कंपन्यांना हवेच्या गुणवत्तेच्या पातळीबाबत जागरुक राहण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. ए क्यु आय पातळीमध्ये कोणताही बिघाड टाळण्यासाठी योग्य उपायांची अंमलबजावणी सुरू ठेवली पाहिजे, असा सल्ला देणारे आयुक्त मात्र, दुसरीकडे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या रस्ते सफाई करण्याच्या पद्धतीकडे सोयीस्करपणे पांघरून घालताना दिसत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरु आहे. हे करीत असताना प्रचंड प्रमाणात मातीचे कण हवेत मिसळून हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात आणखी भर पडत आहे. तसेच झाडूच्या माध्यमातून रस्ते सफाई करण्याच्या पद्धतीतूनदेखील माती हवेत मिसळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारी वाहनं, दुचाकीस्वार, पदपथावरून जाणारे नागरिक आणि परिसरातील निवासी तसेच दुकानं, कार्यालयामध्ये देखील हवेचे कण पसरून त्यांना देखील हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. यावर महापालिकेने ताबडतोब उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
लवकरच यांत्रिकी पद्धतीने मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. त्यामधील व्हॅक्युम क्लीनरमुळे रस्त्यावर धूळ उडणार नाही. हवा प्रदूषित होणार नाही.
– मा. यशवंत डांगे (सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, पिं.चिं . मनपा)…












