न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२३) :- सांगुर्डी व आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण या गावातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने सांगुर्डी येथे चाकण मंडल कृषी विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला.
ज्वारी, हरभरा व गहू या मुख्य रब्बी पिकांसाठी जमिनीची निवड, ओलावा साठवण, मशागत, बियाणे वाण, पेरणी, बीजप्रक्रिया, खतांची मात्रा याबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व सरपंच वसंत भसे यांच्या हस्ते व कान्हेवाडीचे सरपंच राहुल येवले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. विभागीय कृषी अधिकारी गोविंद नाळे, पर्यवेक्षक संतोष सरवदे व श्रीकांत राखुंडे, कृषी सहायक संजय फलके व गणेश विटे यांनी मार्गदर्शन केले.
उसामध्ये हरभरा हे आंतरपीक घेण्याबाबत संजय फलके यांनी मार्गदर्शन केले. या परिसरात मुख्यत्वे भात व सोयाबीन काढणीनंतरच रब्बी पिकांची पेरणी होते. ज्वारी, गहू पिकांच्या कमी झालेल्या क्षेत्रात वाढ होत आहे, ही बाब शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. भात, सोयाबीन, ज्वारी, गहू, बाजरी या धान्यांना शासनाने किमान आधारभूत किमती जाहीर केलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीशीर भाव देणारी पिके घ्यावीत, असे आवाहन नाळे यांनी शेतकऱ्यांना केले.













