- राज्य शासनाच्या दारात पडलाय मंजुरीचा ‘चेंडू’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या वाहतात. या नद्यांची प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नद्या स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने नदी सुधार योजना आणली आहे. मात्र, ही योजना राज्य शासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकून पडली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून सुधारित नियमानुसार अंतिम मंजुरी मिळत नसल्याने महापालिका प्रशासनासह अधिकारी हतबल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला.
अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन थेट उघड्या नाल्याला जोडल्या आहेत. तसेच, अनेक ड्रेनेजलाइन नदीपात्रात आहेत. नदीपात्रालगत अनेक व्यावसायिकांनी अनधिकृत व्यवसाय सुरू केले. त्याचे सांडपाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जाते. त्यामुळे या तीनही नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. पावसाळा सोडल्यास आठ महिने नदीतील पाण्यास प्रचंड दुर्गंधी येते. पाण्याचा रंग काळपट, हिरवा दिसतो तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पवना व इंद्रायणी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यावर फेस आल्याचे समोर आले. नदी प्रदूषणावरून टीकेचे धनी होणाऱ्या पालिका प्रशासनाने नदी सुधार योजना आणत अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शहरातील तीनही नद्यांचा अहमदाबादच्या एचसीपी डिझाइन अॅण्ड मॅनेजमेंट एजन्सीकडून आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार कामकाजाला सुरुवात झाली. मुळा नदीच्या एका बाजूच्या काठाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली
तसेच कामासाठी २०० कोटी रुपयांचे म्युनिस्पल बॉण्ड काढण्यात आले आहे. मात्र, सरकारची मंजुरी मिळत नसल्याने नदी सुधार योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू करता येत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इंद्रायणी नदी प्रकल्पाचा समावेश अमृत योजनेत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. मात्र, या प्रकल्पाच्या आराखड्यास पर्यावरण विभागाची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. इंद्रायणीचा एका बाजूचा १८.८० किमीचा काठ शहरात येतो. दुसऱ्या बाजूचे काम पीएमआरडीए, तर आळंदीतील काम आळंदी नगरपालिका करणार आहे.
पवना व इंद्रायणी तसेच, मुळा नदी सुधार योजनेच्या इतर आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या आहेत. नव्या नियमानुसार राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी शिल्लक आहे. ती मिळताच मुळा नदीचे काम सुरू केले जाणार आहे. शासनाकडून मंजुरी मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू आहे.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग…