- सुदवडीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- आपलं गाव अनधिकृत बांधकाम मुक्त राहण्यासाठी व गावाच्या सुनियोजित अन् शाश्वत विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी, असे आवाहन पीएमआरडीएचे उपायुक्त रामदास जगताप यांनी सुदवडी येथे केले.
सुदवडी गावच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा ग्रामस्थांचे वतीने जाहीर सत्कार त्यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद होते.
जगताप म्हणाले, ‘‘पीएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी प्रारूप विकास आराखड्यास लवकरच मंजुरी येईल. तसेच प्राधिकरणाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले गैरसमज दूर करून आपल्या जमिनी न विकता शहरी विकासातील भागीदार व्हावे.’’
भंडारा डोंगरावरील मंदिरामुळे परिसरातील ५० गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. म्हणून पक्षभेद व गटतट विसरून एकोप्याने गावाचा विकास करावा, असे आवाहन बाळासाहेब काशीद यांनी केले.
सरपंच सुमीत कराळे, उपसरपंच वैभव गाडे, सदस्य गुलाब कराळे, आकाश गोतारणे, सायली कराळे, वैशाली शिंदे व प्रीती शिंदे यांचा जगताप व काशीद यांच्या हस्ते तर ग्रामस्थांच्या वतीने जगताप व काशीद यांचा विशेष सत्कार सरपंच कराळे यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी नगरसेवक संतोष भेगडे, कृषी बाजार समिती संचालक दिलीप ढोरे, आदर्श सरपंच संदीप काशीद, रामभाऊ कराळे, बाळासाहेब कराळे आदी उपस्थित होते. शांताराम कराळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. राहुल कराळे व बाबाजी खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कराळे यांनी आभार मानले.














