न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 13 डिसेंबर 2023) :- ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते.
काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. वयाच्या २० वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे.
३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास ५ हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केले होते. १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.