न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२३) :- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या आदेशानुसार इंदोरी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह कर्मचारी १८ ते २० डिसेंबरअखेर काम बंद आंदोलनात सहभागी झाले असल्याने कार्यालय बंद आहे.
पाण्यावाचून गावाचे हाल होऊ नयेत म्हणून फक्त पाणीपुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग नाही. वेतनश्रेणी, मानधन, निवृत्ती वेतन व ग्रामपंचायतीच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तीन दिवसांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याचे ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी व सरपंच शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक, संगणक चालक, करवसुली कर्मचारी, लिपिक व सेवक असे पाच कार्यालयीन कर्मचारी, सहा सफाई कामगार व दोन वाहन चालक यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.