- ब्राह्मण संघटनेच्या सभेत शिंदे, फडणवीसांचे अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२३) :- ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आश्वासन दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.
यासंदर्भात येथील कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणाच्या परिसरात सोमवार दि. १८ रोजी संघटनेच्या वतीने आयोजित विशेष बैठकीत राजेंद्र कुलकर्णी – तिखे यांनी शिंदे, फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. संघटनेचे अध्यक्ष विलास जोशी यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनी शासनाच्या या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या बैठकीत प्रारंभी शशिकांत कुलकर्णी यांनी श्रीरामाचे स्तवन सादर केले. विजया तारे, शशांक खांडेकर, वासंती जोशी, नूपुर पाडेकर, सुरेश तारे, अनिल कुलकर्णी यांनी यावेळी गाणी, कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. विलास जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन संघटनेच्या वतीने आगामी काळात संघटनेच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रमेश भट यांनी केले.

















