- कंपनीच्या संचालकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- कंपनीच्या आरोपी संचालकांनी त्यांची मिळकत बँकेकडे तारण ठेवून बँकेकडून वीस कोटी रुपये कर्ज घेतले होते. परंतू कर्ज परत फेड न केल्याने बँकेने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गृह शाखा यांच्या आदेशाने नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासोबत पोलीस स्टाफ, बँकेचे पदाधिकारी व पंचासमक्ष (दि. १९) रोजी फॅक्टरी बांधकामासहीत मोहननगर, चिंचवड येथे ताबा कारवाई केली. त्यावेळी आरोपी यांनी विरोध केल्याने सदर ठिकाणी बँकेने सिक्युरीटी गार्ड नेमले होते. सिक्युरीटी गार्ड हे सिलबंद फॅक्ट्री बाहेर गार्ड ड्युटी करीत असताना आरोपी यांनी सिक्युरीटी गार्ड यांना दमदाटी व शिवीगाळ करून, फॅक्ट्रीला लावलेले सिल व कुलूप तोडून नुकसान करून फॅक्ट्रीमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. २०) रोजी १०.०० वा. चे सुमारास मे. कल्पक इंडस्ट्रीयल टेक्नोलॉजीस (ई) प्रा.लि., मोहननगर, चिंचवड येथे घडली. फिर्यादी राजू मल्लप्पा सॉदलगेकर यांनी आरोपी १) चांगदेव रामचंद्र कोलते, २) प्रसाद गणपत कोलते, ३) विवेक गणपत कोलते ४) तुषार चांगदेव कोलते व त्यांचे सोबत असलेले १० ते १५ अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात १२२०/२०२३ भा.दं.वि कलम ४४७,४४८, १८८,३४२, १४३,१४९, ५०४,५०६ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गुळींग पुढील तपास करीत आहेत.














