- रेड झोनच्या सीमेबाबतचा संभ्रम दूर होण्याची शक्यता बळावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बाधित होणाऱ्या रेड झोनची मोजणी महापालिका नव्याने करीत आहे. त्यासाठी १ कोटी १३ लाख ६७ हजार ३०० रुपये मोजणी शुल्क भूमी अभिलेख विभागाच्या पिंपरी-चिंचवड व हवेली विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अचूक व स्पष्ट असा रेड झोनचा नकाशा उपलब्ध होणार आहे. परिणामी, रेड झोनच्या सीमेबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.
देहू ऑडर्नन्स फॅक्टरी डेपो आणि दिपी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून २ हजार यार्ड (१.८२ किलोमीटर) परिषामध्ये रेड झोन (प्रतिबंचित क्षेत्र) आहे. त्या भागात कोणतेही बांधकाम करता येत नाही, असे असतानाही त्या भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहे. ती अनधिकृत बांधकाम इमारतीमधील सदनिका सर्वसामान्य नागरिकांना विकली जात आहेत. त्यातून त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे त्यामुळे हा परिसर बकाल व विद्रुप झाला आहे. त्यासंदर्भात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. अशी परिस्थिती असताना रेड झोनची हद्द नेमकी कोठपर्यंत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जुने किंवा बैठे घर असलेल्या रहिवाशांनानव्याने बांधकाम करता येत नाही, तसेच, त्याच्या जागेस भाव मिळत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने मोजणी करून अचूक नकाशा जाहीर करावा, अशी अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे.
त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासह पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेकडे वारंवार अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. नव्याने मोजणी करून अचूक नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात चर्चाही झाली आहे. अखेर, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही सुरू केली. जिल्हाधिका-यांसमेवत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिका-यांची १८ सप्टेंबर २०२३ ला बैठक झाली होती. त्यात रेड झोन बाधित क्षेत्राची मोजणी करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने भूमापन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. पिंपरी- चिंचवड भूमी अभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिका-यांकडून देहू ऑर्डनन्स फॅक्टरी डेपोच्या बाह्य सीमा भिंतीपासून २ हजार यार्ड परिघातील पिंपरी-चिंचवड शहरातील मोजणी करण्यात येणार आहे.
साधी मोजणी फी १ कोटी ७ लाख १ हजार ३०० रुपये, तातडीची मोजणी फी २ कोटी १४ लाख २ हजार ६०० रूपये, अतितातडीची मोजणी फी ३ कोटी २१ लाख ३ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे त्यांनी महापालिकेस कळविले आहे. महापालिका १८ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रानुसार साधी मोजणीसाठी १ कोटी ७ लाख १ हजार ३०० रूपये शुल्क भरणार आहे.
तसेच, हवेली भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक हे दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसौमा भितीपासून २ हजार यार्ड रेड झोन परिसराची मोजणी करणार आहे. त्यांनी ६ लाख ६६ हजार रुपये अतितातडीच्या मोजणीची फी असल्याचे १३ ऑक्टोबर २०२३ ला कळविले आहे. ते शुल्कही महापालिका भरणार आहे. असे एकूण १ कोटी १३ लाख ६७ हजार ३०० रुपये मोजणी शुल्क महापालिका भरणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
देहू ऑर्डनन्स फॅक्टरी डेपो आणि दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून २ हजार यार्ड परिक्षेत रेड झोन क्षेत्र आहे. पुणे जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेड झोनही मोजणी एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यानी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन अचूक नकाशा प्रसिद्ध केला जाईल.













