न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे कामकाज करण्यास महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनविकास महामंडळ (एफडीसीएम) तयार आहे. त्यासंदर्भात मंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय महापालिकेच्या ताब्यातून राज्य शासनाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तब्बल आठ वर्षे काम करूनही प्राणिसंग्रहालयाच्या सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयास टाळे आहे. तसेच, गेल्या सहा वर्षांत विविध ३६ प्राणी व पक्षांचा मृत्यू झाला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, प्राणी संग्रहालय महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे प्राणिसंग्रहालय लवकराच लवकर सुरू होऊन शहरवासीयांना तेथे चांगली सेवा व सुविधा मिळून पर्यटनवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
प्राणिसंग्रहालयाचे टप्पा एक व दोनचे काम पूर्ण झाले आहे. टप्प्या तीनमधील कामाची निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सल्लागारही बदलण्यात आला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ऑगस्ट २०२३ मध्ये केलेल्या पाहणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तसेच, आयुक्तांशी चर्चा करून एफडीसीएमला पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे नियोजन आहे. एफडीसीएमने सुचविलेल्या नव्या कामांचा ताळमेळ बसवून नव्याने आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर निविदा प्रसिद्ध केली जाईल. निविदा प्रक्रियेस तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कामाची मुदत १२ महिने आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास किमान १५ महिने लागतील, असे महापालिकेच्या क्रीडा व उद्यान स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
आता वनविकास महामंडळाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र पाठविले आहे. नागपूर येथील एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेडचे मुख्या कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला एन. यांनी हे पत्र पाठविले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार या संग्रहालयाचे काम लवकरात लवकर सुरू करून ते पूर्ण करणे, पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन करणे, त्याप्रमाणे सेवा व सुविधा निर्माण करणे आदींबाबत चर्चा करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्याबाबत महापालिका त्यांना पत्र पाठवून बैठक घेणार आहे. तसेच, एफडीसीएमकडून प्रत्यक्ष प्राणिसंग्रहालयाची पाहणी करून आवश्यक कामे करण्याबाबत महापालिकेस नवा आराखडा दिला जाईल. त्यानुसार, महापालिका काम करेल. संपूर्ण काम झाल्यानंतर संग्रहालयाचे संपूर्ण संचालन एफडीसीएम करणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.














