- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना आमदार लांडगे यांचे निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धोरणानुसार खेळाडू दत्तक योजनेची कार्यवाही सुरू करून चालू आर्थिक वर्षात खेळाडुंना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यानुसार शहरातील गुणवंत खेळाडूंना साडे तीन हजार ते साडे पाच हजार रुपयांपर्यंत वार्षिक क्रीडा शिष्यवृत्तीचा हातभार लावला जाणार आहे. 2022-23 या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती 2023-24 मध्ये पात्र विद्यार्थी खेळाडूंना देण्यात येणार आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना वार्षिक 3 हजार 300 रुपये मिळणार आहेत. तर राष्ट्रीय शालेय स्पर्धात (नॅशनल स्कूल गेम / स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) तर्फे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना 5 हजार 500 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.














