न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मोशीतील जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम चौक रस्त्यालगतचे सुमारे आठ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत पाडण्यात आले. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सात अनधिकृत वीट बांधकाम व पत्राशेड पाडण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यात कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, उप-अभियंता सूर्यकांत मोहिते, शिवाजी चौरे, कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, बीट निरीक्षक-कनिष्ठ अभियंता साहेबराव पवार, रुपेश भुराणे, धनंजय शेरखाने आदींनी सहभाग घेतला. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे ४६ जवान, ७ पोलिस कर्मचारी आणि २० मजुरांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.
मोशीतील वखार महामंडळासमोरील खडी मशिन रस्त्यावरील पत्रा व साधे वीट बांधकामाच्या चार हजार सहाशे ५० चौरस फुटाचे बांधकाम तर खडी मशिन रस्त्यावरील तीन हजार तीनशे पाच चौरस फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. यात एकूण सात हजार नऊशे ५५ चौरस फुटाचे बांधकाम निष्कासित करण्यात आल्याची माहिती इ क्षेत्रीय कार्यालयाने दिली.














