- शेतकऱ्यानेही जपली माणुसकी; भावपूर्ण वातावरणात दिला अखेरचा निरोप…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२४) :- मावळातील नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी आपल्या लाडक्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. मात्र, नुकतंच खंड्याचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. आपल्या बैलाच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी मालक राहुल जाधव यांनी बैलाची समाधी बांधली आहे. तसेच या बैलाचा दशक्रिया विधी करून उत्तरकार्यही केले आहे.
नानोली गावातील शेतकरी राहुल जाधव यांनी आपल्या खंड्या बैलाचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. शर्यत पूर्ण करून ‘घाटाच्या राजा’चा मान मिळवून देणाऱ्या खंड्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. खंड्या बैलाला शेवटचा निरोप देताना त्यांनी रितसर दशक्रिया विधी केला. इतकंच नाही तर त्याची समाधी उभारून विधीवत पूजा केली.
बैलगाडा शर्यतीत खंड्या या बैलाने अनेक विक्रम केले तर ६५ हून अधिक शर्यती जिंकल्या. तसेच महाराष्ट्र केसरी म्हणून नावलौकिक खंड्या बैलाने मिळवला होता. मात्र शेवटच्या क्षणी खंड्या या बैलाने घाटाचा राजा होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्याने आपल्या घराशेजारीच लाडक्या खंड्या बैलाचा निधन झाल्यानंतर दफन विधी केला आणि त्यानंतर दहावा विधी आणि उत्तरकार्य देखील केले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.













