न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ९ मे २०१९ रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २ ते ३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि ४ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्जाचे वाटप केले जाणार आहे.
४ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. क्षेत्रीय अधिका-यांकडे अर्ज जमा करायचे आहेत. ९ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात निवडणुकीला सुरुवात होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. आठही प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपचा अध्यक्ष विराजमान होऊ शकतो.











