- बुधवारची नियोजित बैठक ऐनवळी केली रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यास (डीपी) मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २४) होणारी बैठक ऐनवळी रद्द करण्यात आली. त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी पीएमआरडीएला पाठवले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकरणाचा ताण कमी करण्यासाठी पीएमआरडीएने २०१७ मध्ये विकास आराखडा जाहीर केला होता. त्यानंतर २ ऑगस्ट २०२१ मध्ये प्रारूप विकास आराखडा तयार करून जाहीर केला. त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागविण्यात आल्या. सुमारे ६७ हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या.
दरम्यान, पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी राज्य सरकारला त्यासाठी उच्च न्यायालयाची अनुमती घ्यावी लागणार आहे. वसंत सुदाम भसे, सुखदेव तापकीर आणि दीपाली हुलावळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर होतो की वादात सापडतो किंवा पीएमआरडीएच बरखास्त होते याचे उत्तर नजीकचा काळच देऊ शकेल.











