न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर तर्फे आकुर्डी येथील पक्ष कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष कनिष्क जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी कनिष्क जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले आहे त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. हे संविधान तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या देशामध्ये असंख्य जाती असून देखील आपल्या सर्वांना ज्यांनी एकत्र बांधून ठेवले आहे ते म्हणजे भारताचे संविधान. संविधानाचे जे मूळ सूत्र आहेत त्याच्या प्रत्येक घटनांवर चालणारा एकमेव पक्ष हा आम आदमी पक्ष आहे. त्याचप्रमाणे कनिष्क जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व लहान मुलांना खाऊ वाटप केले.
या प्रसंगी संविधानाचे पठण राज चाकणे यांनी केले, शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले. सूत्रसंचालन यशवंत कांबळे यांनी केले. यावेळी लहान मुले, मुली, महिला, जेष्ठ नागरिक, परिसरातील अनेक नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











