- भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे.
ईव्हीएमचा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्यप्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी खात्री पटली आहे की ईव्हीएममध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे. त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. जर ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुण्यातील खासगी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मुलाखत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी घेतली.
संजय राऊत म्हणाले, राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही. भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही. राजकारणामध्ये विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे. ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. परंतु सध्या मात्र विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे. या संघर्षामध्ये शिवसेना कायम लढत राहणार आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप केले जातात. परंतु जे आरोप करतात तेच लोक शिवसेना सोडून जातात. आम्ही मात्र शिवसेना वाचवण्याचे काम गेल्या ४० वर्षांपासून करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत.











