न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- वाकडच्या काळाखडक झोपडपट्टीतील रहिवाशांना विश्वासात न घेता विकसक एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबवित असल्याचा आरोप करत रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली काळाखडक चौकात सोमवारी सकाळी निदर्शन आंदोलन केले.
झोपडपट्टीत एसआरए पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी रहिवाशांच्या चुकीच्या पध्दतीने सहमती घेण्याचे काम करत आहेत. काही दलाल व गुंडांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने व दडपशाहीने काहीजण येथे रहिवाशांना अर्ज भरण्यास भाग पाडले जात आहे असा आरोप करत रहिवाशांनी घोषणाबाजी केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयावर व महापालिका भावनावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा अनिल जाधव यांनी दिला. यावेळी काळाखडक परिसरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, रहिवाशी उपस्थित होते.











