- विकसक विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा. लि. संस्थेला पालिकेचे पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- वाकड येथील टीडीआर प्रकरणातील बांधकामास स्थगिती आदेश देण्यात आला आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी विकसकाला दिले आहेत.
वाकड येथील सर्व्हे क्रमांक १२२ येथील विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ४/३८ ट्रक टर्मिनस (काही भाग) व ४/३८ पीएमपी डेपो या आरक्षणासाठी १० हजार २७४ चौरस मीटर क्षेत्रात युडीसीपीआरनुसार व्यापारी प्रकल्प करण्यात येत आहे. या प्रक्रियेवर आक्षेप घेत संबधित विकसकाला ज्यादा टीडीआर देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनात त्याबाबत गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. तसेच, विविध राजकीय पक्ष व संघटनांनी त्यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, शहर अभियंता निकम यांनी संबधित विकसक विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा. लि. या संस्थेला पत्र पाठवले आहे. आयुक्त यांनी समावेशक आरक्षणे विकसित करण्याच्या बैठकीत दिलेली मान्यता व करारनामा झालेला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. त्यानंतर १० जानेवारी २०२४ ला झालेल्या बैठकीत या प्रकल्पास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेशापर्यंत काम थांबवावे, असे निकम यांनी पत्रात नमूद केले आहे.











