- दहा वर्षांतील योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणार – शंकर जगताप…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२४) :- लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत गरीबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेली विकास कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार, ‘गाव चलो अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी येत्या ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत शहरामध्ये हे अभियान बूथ पातळीवर सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
पिंपरी येथील भाजप शहर कार्यालयात जिल्हा पदाधिकारी यांची मंगळवारी (दि. ३०) बैठक घेण्यात आली. यावेळी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ‘गाव चलो अभियान’ राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. अभियान संयोजक भाजप सरचिटणीस विलास मडिगेरी, चिंचवड विधानसभा सहसंयोजक सिध्देश्वर बारणे, पिंपरी विधानसभा सहसंयोजक महेंद्र बाविस्कर, भोसरी विधानसभा सहसंयोजक पोपट हजारे यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीवेळी प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, अजय पाताडे, शैला मोळक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील ४५ हून जागा जिंकण्याची रणनीती आखली असून त्यादृष्टीने तयारी जोमाने सुरु आहे. पक्षातर्फे ‘गाव चलो अभियान’ सुरू करण्याचे ठरविण्यात आले असून पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक बूथवर विस्तारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या १० वर्षांतील योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतील, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.











