न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांसाठी शहरातील नागरिक आणि विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजनासंदर्भातील सूचना लेखी स्वरूपात पिंपरी येथील महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभागात प्रत्यक्ष सादर कराव्यात अथवा pro@pcmcindia.gov.in या मेलवर दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ५.०० वाजेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वानिमित्त शहरातील विविध ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संघटना आणि संस्था आदींकडून प्रबोधन पर्वानिमित्त सूचना मागविण्यात येत आहेत.

















