- प्रकल्पासाठीची ९५ कोटींची तरतूदही अनावश्यक?..
- रावेत इको पार्क व रेल्वे लाईन परिसराकडे लक्ष देण्याची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- नियोजित तळवडेतील जैव विविधता प्रकल्प; ” हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे” नव्हे काय? – विजय पाटील – : रावेत इको पार्क व सेक्टर २९ रेल्वे लाईन परिसरात लक्ष केंद्रीत केल्यास विनाखर्च जैवविविधता पार्क बनू शकते.
तळवडे येथे इंद्रायणीनदी काठच्या परिसरात जैव विविधता पार्क उभारण्याकरिता ९५ कोटींची तरतूद पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी तात्काळ ३ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा जैव विविधता प्रकल्प करण्याचे नियोजन असल्याचे पालिकेने जाहीर करूनही टाकले आहे. मुळात नियोजित तळवडे येथील जैवविविधता प्रकल्प म्हणजे ” हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे ” नव्हे काय? असा सवाल प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे समन्वयक व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. तसेच रावेत इको पार्क व सेक्टर २९ रेल्वे लाईन परिसरात लक्ष केंद्रीत केल्यास विनाखर्च जैवविविधता पार्क बनू शकेल, असा सल्लाही त्यांनी महापालिकेला दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून रावेत प्राधिकरणातील पर्यावरणप्रेमी रावेत येथील सर्व्हे क्रमांक १९२ /१९४ मधील पाच एकर परिसरातील ” इको मेट्रो पार्क ” वाचवण्यासाठी संघर्षरत आहेत. तरीही प्रशासन ढिम्मच दिसून आले. सन २०२३ मध्ये काही पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडेही दाद मागितली. त्यांना त्यावेळेस असेही लक्षात आले की, निवडणूक विभागाकडे पीएमआरडीए या प्राधिकरण संस्थेकडून इको मेट्रो पार्कची जमीन हस्तांतरित करीत असताना अप्पर तहसीलदार यांनी पंचनामा खोटा बनविला. सकृतदर्शनी तसे दिसून येत आहे. त्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक प्रजातींची शेकडो झाडे अस्तित्वात असताना ती जागा मोकळी व पड असल्याचे भासवले आहे. हा पंचनामा बनविताना महाराष्ट्र शासन, निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी तसेच पार्क बनविताना हातभार लावणारे रावेत परिसरातील वृक्षप्रेमी यांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे त्यामुळे सिद्ध होते, असेही पत्रकात म्हटले आहे.
यापूर्वीही तळवडे येथे डियर पार्क उभारण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. त्यासाठीही पालिकेने खर्चाची तरतूद केली होती. कालांतराने तो प्रकल्प कागदावरच राहिल्याने तळवडे येथे जैव विविधता पार्क उभा करण्याचे नियोजित करण्यात आले. तळवडे येथील नदीकाठी असणाऱ्या जागेत मोठ्या प्रमाणात हिरवाई नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीची तिथे आवश्यकता दिसून येत नाही. तरीही ९५ कोटींची तरतूद ही संशयाच्या भोवऱ्यात नक्कीच अडकणार आहे. कोट्यावधी रुपयांची गरज नसताना तशी तरतूद का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. रावेत प्राधिकरणात व्यवस्थित लक्ष केंद्रित केल्यास इको मेट्रो पार्क परिसरातील १० एकर परिसरात मोठे जैवविविधता पार्क उभे राहिल. त्यासाठी लोकसहभाग मोठा असेल तसेच पालिकेला एक रुपया खर्च करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे पालिका हातचे सोडून तळवडेसारख्या ठिकाणी पळत्याच्या पाठी लागून नागरिकांच्या पैश्याची उधळपट्टी करताना दिसून येत आहे. सदरचे पार्क पुणे मेट्रोच्या पुढाकारानेच सन २०१८ मध्ये बनविण्यात आले होते, असेही पत्रकात म्हटले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे अप्पर तहसीलदार यांनी नोंदविलेला पंचनामा धांदात खोटा दिसून येत असून त्यांनी भारतीय दंड संहिता कलम १७७ चे उल्लंघन केलेले दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३(१) ड चे ही उल्लंघन केले आहे. सर्वात मोठे उल्लंघन त्यांनी लोकसेवा आयोगाच्या नियमांचे केलेले दिसून येत आहे. ते सिद्ध झाल्यास १० वर्ष सक्षम कारवासाची कायद्यात तरतूद आहे. प्राधिकारणातील वृक्षप्रेमी, पर्यावरण संस्था व नागरिकांच्या मेट्रो इको पार्क वाचविण्याच्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. त्याचप्रमाणे तळवडे येथील नियोजित जैव विविधता प्रकल्प कामाचे फेरसर्वेक्षण करूनच खर्चाची तरतूद करावी, असे या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे.