- तळेगाव-चाकण महामार्गापासून दररोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट..
- पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, देहू, तळेगावपासून हवी थेट पीएमपी बससेवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरापासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर वसलेल्या तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात पीएमपीची बससेवा बंद आहे. त्यामुळे स्थानिकांसह इतरांना तळेगाव-चाकण महामार्गापासून श्रीक्षेत्र सुदुंबरे गावात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून निगडी, भोसरी, चाकण, तळेगाव, देहू ते श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे जाण्यासाठी पीएमपी बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, त्याकडे पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडून कानाडोळा केला जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटनासाठी दीड वर्षांपूर्वी देहूगावात आले होते. तेव्हा त्यांनी आवर्जून सुदुंबरे गावासह येथील तेली समाजाचं भूषण ‘ ब ‘ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचा आणि महाराजांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्याच गावात पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडून साधी पीएमपी बसची सेवा पुरविली जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
याशिवाय गावात महत्वपूर्ण केंद्र सरकारचे एनडीआरएफ केंद्र आहे. मावळ तालुक्यातील सिद्धांत कॉलेज नावाची मोठी शैक्षणिक संस्था गावात आहे. तिथे दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यातून येत असतात. तसेच चाकण आणि तळेगाव एमआयडीसीत कामाला जाणारा मोठा कामगार वर्ग देखील याच गावातून ये-जा करीत असतो. याशिवाय गावाला लागुनच भंडारा डोंगर, सूदवडी, वासुली, भांबोली आणि इतर गावांच्या सीमा आहेत. तिथे जाणारे देखील सुदुंबरे गावातूनच ये-जा करीत असतात. अशा महत्वपूर्ण गावात पीएमपी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना नुकतेच पीएमपी बस सुरु करण्याबाबत निवेदन दिले आहे. निगडी ते श्रीक्षेत्र सुदुंबरे पीएमपी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. – मा. कालिदास गाडे पाटील, गावचे ग्रामस्थ तथा उद्योजक…
तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात पीएमपीची बसफेरी सुरु व्हावी, यासाठी अनेकदा भोसरी आगारासह पीएमपीएमएल व्यवस्थापनाशी संपर्क केला. भोसरी, तळेगावमार्गे तीर्थक्षेत्र सुदुंबरे गावात बस सुरु करा, अशी मागणी केली आहे. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही.
– मा. चंद्रकात जाधव, व्यवस्थापक – संत संताजी जगनाडे महाराज मंदिर ट्रस्ट, सुदुंबरे…