- मुख्याधिकाऱ्यांची देहूरोड पोलिसांकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- देहूगाव नगरपंचायत हद्दीत अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकास धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूनगर पंचायतीच्या वतीने सोमवारपासून ध्वनिक्षेपाद्वारे सूचना देऊन सूचित करण्यात आले होते. त्या प्रमाणे बुधवारी पंचायतीचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक महिला, त्यांच्या दोन मुली आणि मुलगा अर्जुन परदेशी यांनी दुकानाचे सामान अनधिकृतरित्या रस्त्यावर ठेवले होते. याबाबत विचारले असता, अतिक्रमणधारक हजर नसल्याने अतिक्रमणविरोधी पथकाने ते सामान वाहतूक गाडीत भरले. कारवाई चालू असताना महिला आणि त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य त्या ठिकाणी आले. त्यांनी वाहनात टाकलेले सामान खेचून घेत कारवाईत अडथळा निर्माण केला. तसेच अधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करून कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, कर्मचारी ज्ञानेश्वर निकम यांना मारहाण केली.
नगरपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे सदर अतिक्रमणधारकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी लेखी तक्रार देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी देहूरोड पोलिसांकडे दिली आहे.