- ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडीची वीज समस्या सुटणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- विजेची वाढती मागणी तसेच दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताथवडेतील ‘यशदा’च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्च दाबाचे २२०/२० केव्ही उपकेंद्र यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे ८५ हजार विज ग्राहकांना होणार आहे. अति उच्चदाबाचे हे नवीन उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही महापारेषणकडून करण्यात येणार आहे.
पुणे परिमंडलातील भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता महावितरणकडून आतापर्यंत चर्होलीतील २२०/३३/२२ केव्ही, प्राईड वल्र्ड सिटी, मोशीतील २२०/२२ केव्ही हे दोन नवीन अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच सेन्चुरी एन्का उपकेंद्राची १०० एमव्हीएने क्षमतावाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. आता ताथवडेतील तिसरे अतिउच्चदाब उपकेंद्र देखील मंजूर झाले आहे.
महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, किवळे, चिंचवड तसेच भोसरी विभागातील रावेत व आकुर्डी परिसरातील सुमारे २ लाख २९ हजार ७०० वीज ग्राहकांना महापारेषणच्या २२०/२२ केव्ही चिंचवड व २२०/२२ केव्ही हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो.
ताथवडेतील अतिउच्चदाबाच्या नवीन २२०/२२ केव्ही यशदा उपकेंद्रातून २२ केव्ही क्षमतेच्या १० नवीन वीजवाहिन्या निघतील तर ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील. या १० वीजवाहिन्यांद्वारे ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे ८५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल. तसेच, हिंजवडी व चिंचवड अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रावरील वीजभार कमी होणार असल्याने एकूण सुमारे २ लाख २९ हजार ७०० वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल.
पुणे परिमंडळामध्ये नागरीकरण मोठ्या वेगाने होत आहे. विजेची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वीज पुरवठयाच्या स्थितीचा वेध घेऊन पायाभूत वीजयंत्रणेचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रस्तावित केलेल्या ताथवडेतील अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ…











