न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- शहरात दर महिन्याला सरासरी पाच हजारांपेक्षा जास्त जन्माच्या नोंदी केल्या जातात, तर मृत्यूच्या सरासरी तीन हजार नोंदी केल्या जातात. मात्र, दाखला घेण्यासाठी व दाखल्यात नाव, आडनाव, जन्मतारीख बदल व दुरुस्तीसाठी वायसीएममध्ये गर्दी होत आहे.
त्यामुळे नागरिकांना दाखल्यासाठी हेलपाटे मारूनही वेळेत दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना स्मशानयातना सहन कराव्या लागत आहेत.
महापालिकेअंतर्गत आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. नागरिकांना आपल्या भागा जवळच या कार्यालयात नाव नोंदणी करून नावात व आडनाव बदल, जन्म-मृत्यूची दुरुस्ती कामे करून मिळावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. तसेच काही ठिकाणी जन्म-मृत्यूच्या नोंदणीचे कार्यालये आहेत. मात्र, त्या ठिकाणी कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे वायसीएमकडे नागरिक धाव घेतात. जन्म-मृत्यूचा दाखला घेण्यासाठी नागरिकांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयामध्ये यावे लागते. या ठिकाणी येण्यासाठी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे भूर्दड बसतो.
नागरिकांच्या गर्दीमुळे महापालिका व सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय व महापालिका कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी, या अधिकाऱ्यांना नागरिकांशी संवाद साधण्यासह नागरिकांची कामे सुरळीत पार पाडण्यास मदत होईल, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
वायसीएममध्ये पुणे जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार केले जाते. तसेच अनेक ठिकाणाहून आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येते. त्याचे अहवालही पोलिसांना पाठवावे लागतात. काही प्रकरणामध्ये व्हिसेरा राखून ठेवण्यात येतो, त्याचा अहवालही पाठवावा लागतो, त्यामुळे कर्मचा-यांवर ताण येत आहे. जन्म-मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी व दुरुस्तीसाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सर्व नागरिक या ठिकाणी येत असल्याने गर्दी असते. नागरिकांना लवकरात लवकर दाखले वितरित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
– डॉ. कल्पना बळीवंत, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, महापालिका…











