न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- मोशी येथे महापालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येत होता, त्याच्या चौथऱ्याचे काम सुरू असताना तो सेक्टर पाच व आठमध्ये हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, या नव्या जागेत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे काम सुरू आहे. पुतळा उभारणीमुळे त्या प्रकल्पास बाधा येणार येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे. यातून महापालिकेचे ४९ कोटी पाण्यात जाणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनीच वर्तवली आहे.
मोशी येथील २४० एकर जागेत पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन केंद्राचा टप्प्याटप्याने विकास केला जात आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात तीन प्रदर्शन हॉल (एकत्रित क्षेत्रफळ-१ लाख ५ हजार चौरस मीटर), एक कन्व्हेन्शन सेंटर (५ हजार आसन क्षमता), खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी मोकळे मैदान (९८ हजार चौरस मीटर), अंतर्गत रस्ते, बगिचे, तलाव, व्यापारी वापरासाठी राखीव जागा, भूमिगत पेट्रोलियम लाइनसाठी संरक्षित खुली पट्टीच्या स्वरूपातील जागा-ग्रीन बेल्ट, मेट्रो स्थानक आदी बाबींचा समावेश आहे. ११ हेक्टर क्षेत्राचे सपाटीकरण व संपूर्ण प्रदर्शन केंद्राच्या क्षेत्राला सीमाभिंत टाकण्याचे काम पूर्ण झाले. त्यात पुतळा उभारण्यात येत असल्याने केंद्राला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे.
महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या दोन पुतळ्यांसाठी सेक्टर पाच व आठमधील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन व कन्व्हेन्शन केंद्रातील प्रस्तावित २.५ एकर क्षेत्र जागा घेतली आहे. त्या बदल्यात महापालिकेने ४९ कोटी ७४ हजार २६२ रुपये रक्कम प्राधिकरणाला दिली आहे. दोन्ही पुतळ्यांच्या मध्ये अंडरपास करून देण्यासाठी वेगळा खर्च महापालिकेने करायचा आहे. प्राधिकरणाने दिलेल्या जागेत महापालिका कोणताही उत्पन्न देणारा प्रकल्प राबवणार नाही, असे स्वतः आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरीपत्रात लिहून दिले आहे. यामुळे या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा झाला नाही तर, ती जागा महापालिकेला दुसऱ्या कोणत्याही वाणिज्यिक प्रकल्पासाठी वापरता येणार नसल्याने प्राधिकरणाला दिलेली रक्कमही पाण्यात जाण्याची शक्यता आहे.











